MSG
" एकदाच तू पोलीस हो "
हे सुजाणं मानवा
एकदाच तू पोलीस हो
एकदाच तू पोलीस हो
अपघाता चे नाव अंगावर काटा आणते
बलात्काराने मनाचा थरकाप होतो
त्याच आरोपीला सतत कुरवाळावे लागते
काटे गोटे काच रोज एकदातरी लागते
रक्तबंबाळ अवयवांवर प्रेम करावे लागते
विखुरलेले अवयव गोळा करावे लागतात
मेलेल्या अर्भकाचा पंचनामा करावा लागतो
सडलेल्या अवयवातील अळ्या हातावर बागडतात.
हे भल्या माणसा ,
एकदाच तू पोलीस हो
एकदाच तू पोलीस हो
रोज नवे प्रश्न आणि अवघड उत्तरे
जमले तर बरे अन्यथा अब्रूची लक्तरे
नाकात वसणाऱ्या गंधाला काय करतील अत्तरे
सत्य कसे सांगावे अन खोटे कसे बोलावे
घाण साफ केलेल्या हातानी जेवून बघ
भयाण दृश्ये आठवत झोपून बघ
हे सुजाण मानवा
एकदाच तू पोलीस हो
एकदाच तू पोलीस हो
चुकला की मेला, आरोपी ही आणि स्वतःही
कारण देवाचा अवतार तू
चुकण्याचा अधिकार गमावलास तू
साधतोस तू स्वार्थ आणि परमार्थही
ना तू कृष्ण ही, ना होतो तुझा पार्थ ही
तू स्तंभ आहेस माणुसकीचा
तू स्तंभ आहेस सभ्यतेचा
तू स्तंभ आहेस सहृदयतेचा
तू स्तंभ आहेस समाजाचा
तुला ना हक्क भेळ,पाणी पुरी खाण्याचा
तुला ना हक्क आनंदात रस्त्यावर फिरण्याचा
तुला ना हक्क सिनेमागृहात शिट्टी मारण्याचा
तुला ना हक्क सौन्दर्यवतिकडे बघण्याचा
हे रंगेल माणसा
एकदाच तू पोलीस हो
एकदाच तू पोलीस हो.
ही कविता माझ्या सर्व पोलिस मीत्राना समर्पित
0 comments:
Post a Comment