NILA WADAL

हॉटेलात जेवताना
हातात घेतलेला घास
तोंडाजवळ घेताच
डोळ्यासमोर रमाई दिसली....
अचानक झालेल्या त्या दर्शनाने
घास हातातच ठेऊन
मी तिच्याकडे बघत बसली....

आज रमाई कशी आली
माझ्या विचारात....
काही विचारायच्या आधीच
मग्न झाली ती तिच्या सांगण्यात....

लेकी काही नाही गं
तुला बघाया आली होती....
ज्या सुखांच्या दिवसांसाठी
आम्ही झटत होतो,
तो दिवस आज बघाया आली होती....

उपासात दिवस काढले गं मी बाय....
पण तुला पोटभर खाताना मला बघायचं हाय....

बरं वाटतय तुम्हाला
हे असं बघुन....
मोठा झालाय आपला समाज
आता शिकून - सवरून....
दुःखाचं दिवस
गेलय आता आपलं सरुन....
तीला मधेच थांबवत मी म्हणाले,
आई तु आणि बाबांनीच
दिलंय की गं हे सारं वैभव भरभरून....

पाणी आले तिच्या  डोळ्यात
माझे हे शब्द ऐकताना....
बरं वाटतं बघ लेकी
पोरं आई बापाचं असं कौतुक करताना....

आई का नको करु गं तुझं कौतुक?
अगं तु एका फाटक्या लुगड्यावर
दिवस काढलं....
पण समाजापुढं हे
सोन्याचांदीचं ताट वाढलं....

अगं बाबांची लेखनी जेव्हा तिथं
जातीवाद्यांशी लढत होती....
तेव्हा तु चुलीपुढं परिस्थितिशी
दोन हात करत होती....

माझा धनी या अख्ख्या समाजाला
लेकरासारखा संभाळतोय
हे जेव्हा तुला कळलं....
तेव्हा पोटच्या पोरांच्या
मरणाचे दुःख
तु निमुटपणे गिळलं....

डोक्यावरून हात फिरवत
आई म्हणाली,
लेकी मला परिस्थितिचं दुःख
अजिबात नाही....
पण सायबांना त्यांचं स्वप्न पुर्ण कराया
वेळच मिळाला नाही....

आयुष्यभर धनी माझा
स्वप्नांसाठी झटला....
पण जेव्हा खरी वेळ आली
तेव्हा मात्र काळच त्यांच्या हातातून निसटला....

तो काळ आता तुमच्या हातात हाय....
तिचा हात हातात घेऊन मि म्हणाले,
आई हा काळ आम्ही असा
वाया जाऊ देणार न्हाय....
बाबांचं स्वप्न हे त्यांच्या
लेकरांच्याही डोळ्यात हाय....
आणि ते स्वप्न पुर्ण कराया
तुझी कितीतरी लेकरं इथं
झटत हाय....
लढण्याची ताकद तर आम्हा
बाबांनीच दिली हाय....
तु काळजी करू नकोस आई,
बाबांच्या कष्टाचं असं आम्ही
पाणी होऊ देणार न्हाय....

जीवात जीव असे पर्यंत
बाबांच्या स्वप्नांसाठी
लढा देणार हाय....

जीवात जीव असे पर्यंत
बाबांच्या स्वप्नांसाठी
लढा देणार हाय....

आई सुखावली....
डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवत,
" खा लेकरा पोटभर "
असं म्हणुन भरल्या डोळ्यांनी
निघून गेली....

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog