MSG

दोस्ता,  कुठे बेपत्ता झालास ?

बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही !
भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

अगदी डिलक्स नाही,
पण शोभेलसा बार पाहू,
व्होड्का मिळेलच तिथे;
नाही तर ओल्ड मंक सांगू,
अर्धा सोडा, अर्धे पाणी;
संगतीला विल्स घेऊ,

दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

कोकण, विदर्भ, मराठवाडा, उरलेला महाराष्ट्र,
प्रश्नांचा नाही तुटवडा,
हवे तर बेळगाव मांडू,
मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ,
डावे-उजवे करीत करीत,
आपण चिअर्स म्हणू,
दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

नवे साहित्य, जुने वाङ्मय, विदेशातील संमेलन,
कवितांचे तेच तेच,
कथांमध्ये तर नाहीच दम,
कादंबरीत ना कस,
असंतोष यांच्यात नाही दिसत,
नव्या सांस्कृतिक धोरणाचा यासंबंधी निकाल करू,
दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये,
नाटकं केवळ पेपरांत,
पथनाट्ये सुरवातीलाच बरी,
संगीत उरले समुहात,
फैज आणि गालीबची
फेरउजळणी एकदा करू,
शहरीकरणात सांस्कृतिकतेची,
नवी जाणीव जमवून पाहू...
दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!

चौथा पेग होईल तेव्हा
चिकन चिली संपली असेल,
जेवणाची गरज नसेल म्हणून
आणखी एक निप मागवू,
उठताना क्रेडिट कार्डाऐवजी,
बिल दोघंही शेअर करू,
आपल्याच 'सच्चेपणा'ला
आपणच सलाम ठोकू,

अन्
दोस्ता,
भेट पुन्हा एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू !!!

������

Share this:

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Blog Archive

Powered by Blogger.

Recent

Comment

NEXT PAGE

FOR NEXT PAGE CLICK ON OLDER POSTS.

Search This Blog